वर्धा : भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईने भारतीय जनता या सैनिकांचे तोंडभरुन कौतुक करीत आहेत. या अभिमानास्पद कारवार्ईत वर्धा जिल्ह्यातील राजेंद्र निंभोरकर या सूपूत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे. राजेंद्र निंभोरकर हे पंजाब रेजिमेंट बटालियनचे कमांडिंग आॅफिसर आहेत. ही कारवाई फत्ते करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती आहे.
राजेंद्र निंभोरकर यांचे वर्धा जिल्ह्यातील आष्टी(शहीद) तालुक्यातील वर्धपूर हे मूळ गाव. उल्लेखनीय, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना १९९८ मध्ये झालेल्या कारगील युद्धाच्यावेळी भारतातील सर्वात मोठ्या पंजाब रेजिमेंट बटालियनचे ते कमांडिंग आॅफिसर होते. त्यावेळीही त्यांनी
महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा हा अनुभव या कारवाईतही महत्त्वाचा ठरला आहे. पंजाब रेजिमेंट हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय भूसेना (मिल्ट्री)मध्ये अस्तित्वात असून आजतागायत देशाची सेवा करीत आहे. ही देशातील मोठी रेजिमेंट आहे. ५९ वर्षीय निंभोरकर हे या रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल म्हणून कर्तव्य बजावत आहे. निंभोरकर यांनी महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्याचे आर्मीचे प्रमुख म्हणून कर्तव्य बजावले आहे.