राहुल रनाळकर , मुंबईदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीत सत्ता असावी, ही भाजपाची खूप जुनी महत्त्वाकांक्षा होती. तथापि, राज्यात लहान भाऊ हे बिरुद लागले असल्याने मुंबईत हातपाय पसरायचे तरी कसे हे भाजपाला काही केल्या उमगत नव्हते. पण देशापाठोपाठ राज्यात मुसंडी मारल्याने मुंबईची सत्ता भाजपाला अडीच वर्षांपासूनच खुणावू लागली होती. गुजराती मनांना तर मुंबईचे भलतेच आकर्षण. काहीही करून मुंबई काबीज करायची ही सुप्त महत्त्वाकांक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची होती. त्यामुळेच मुंबईसाठी रणनीती आखणे भाजपाने अडीच वर्षांपूर्वीच सुरू केले होते. त्या रणनीतीला लागलेली फळे म्हणजे महापालिकेचा ताजा निकाल. आकडा ८२. शिवसेनेकडून कोणतीही सत्ता खेचून घेतली किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यातूनही त्यांना बाहेर पडावे लागले तरी सेनेला फार दु:ख होणे संभवत नव्हते. पण मुंबई ही शिवसेनेसाठीही दुखरी जागा आहे. मुंबईवर आपलीच सत्ता राहावी, हे गणित गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेने जपून ठेवले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपापेक्षा अवघ्या २ जागा जास्त मिळवून शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला. काही अपक्षांची मदत घेऊन शिवसेना आपली ताकद आता अधिक वाढविण्याचा प्रयत्न करेल. भाजपाला देखील अन्य पक्षीयांसह अपक्षांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात महापौरपद हा सगळ््यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. सत्ता स्थापनेचे सूत्र अजून स्पष्ट झालेले नाही. युती पुन्हा होणार का? झाली तर ती कोणत्या निकषांवर होईल, हे पाहणं सर्वांत महत्त्वाचं ठरणार आहे. युती झाल्यास भाजपाकडून महापौरपदाची मागणी सहाजिकच होईल. त्यामुळे चर्चा किती होणार आणि तडजोडीचे मुद्दे कुठले असतील, हे स्पष्ट व्हायला थोडा अवधी जाईल. शिवसेनेने प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाविरुद्ध आघाडी नेतृत्त्व करण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे उद्धव यांचा तोच रोख कायम राहणार? की युतीकडे कल राहील, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
राज्याच्या राजकारणाचे ‘रोलमॉडेल’
By admin | Published: February 25, 2017 1:10 AM