मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील सुमारे ५० फूट लांबीचे छत (फॉल सिलिंग) अचानक कोसळल्याने मंत्रालय नूतनीकरण कामाच्या निकृष्ट दर्जाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. छत कोसळले तेव्हा कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत कंत्राटदार युनिटी कन्स्ट्रक्शन व आर्किटेक्ट राजा अडेरी यांची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव, विशेष कार्य अधिकारी व जनसंपर्क अधिकारी यांची दालने असलेल्या ठिकाणचे छत (फॉल सिलिंग) कोसळले. पण ही घटना रविवारी रात्री घडली की सोमवारी सकाळी, हे समजू शकले नाही. कारण घटना घडली तेव्हा कार्यालयात कुणीही हजर नव्हते. सोमवारी सकाळी जेव्हा अधिकारी व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले, तेव्हा त्यांना ठिकठिकाणी या छताचे तुकडे पडलेले दिसले. लागलीच ही बाब राज्याचे मुख्य सचिव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नजरेस आणून देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की खात्याचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांना आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत चौकशी करण्यास सांगितले आहे. या निकृष्ट कामासंदर्भात कंत्राटदार युनिटी कन्स्ट्रक्शन व आर्किटेक्ट राजा अडेरी यांचीही चौकशी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी) नूतनीकरणावर २२० कोटी खर्च मंत्रालयाच्या नूतनीकरणावर २२० कोटी रुपये खर्च झाले आहेत, मात्र कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. पावसाच्या सुरुवातीला ठिकठिकाणी पाणीगळती सुरू झाल्याने मंत्रालय नूतनीकरणाच्या कामाचे बिंग फुटले. आता अचानक छत कोसळले. मंत्रालयातील स्वच्छतागृहातील काम इतके निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, की तेथील नळ गळू लागले असून शौचालयातील फ्लश निकामी झाले आहेत. काम पूर्ण न करताच कंत्राटदाराने गाशा गुंडाळल्याचे सरकारचे मत आहे. तर कंत्राटात उल्लेख नसलेली कामे करण्याची सक्ती केली जात आहे, असा कंत्राटदाराचा दावा आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील छत कोसळले
By admin | Published: September 15, 2015 5:19 AM