ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी चेंबूरमधील एका कुटुंबाला बेघर होण्यापासून वाचवले. अमृता फडणवीस यांनी वेळीच हस्तक्षेप करुन डोक्यावरचे छप्पर वाचल्याबद्दल वंदना दावाणे यांनी अमृता यांचे आभार मानले. वंदना दावाणे यांचे पती उत्तम दावाणे यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लिलावती रुग्णालयाने उपचाराचे एकूण बिल २७ लाख रुपये लावले. बिलाची इतकी रक्कम दावाणे कुटुंबाला परवडणारी नव्हती. लिलावती रुग्णालयात हलवण्याआधी उत्तम यांच्यावर चेंबूर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिथे रक्ताच्या गाठी झाल्याने त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी चांगल्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
वंदना यांनी उत्तम यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले. उपाचाराचे २७ लाखाचे बिल भरण्यासाठी वंदना यांनी दागिने विकून आणि नातेवाईकांच्या मदतीच्या आधारावर सहा लाख रुपये उभे केले. पण उर्वरित २१ लाख जमविण्यासाठी त्यांना रहाते घर विकावे लागणार होते. पैशांची जुळवाजुळव सुरु असताना वंदना दावाणे यांची सामाजिक कार्यकर्ते रफीक मुलानी यांच्याशी ओळख झाली.
मुलानी यांनी भाजपचे स्थानिक नेते माया हाडे यांच्या मदतीने अमृता फडणवीस यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली. अमृता फडणवीस यांनी लिलावती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन उर्वरित २१ लाख रुपयाची रक्कम माफ करुन दिली. इतके सर्व करुन उत्तम दावाणे यांचे प्राण वाचवता आले नाहीत. 'नव-याला वाचवू शकलो नाही पण अमृता फडणवीस यांच्यामुळे डोक्यावरचे छप्पर तरी वाचले' असे वंदना यांनी सांगितले.