कल्याण : चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून सामान्यांची परवड सुरू आहे. या निर्णयाला ११ दिवस उलटले तरी सामान्यांना अजून दिलासा मिळालेला नाही. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या बाहेर आजही पैसे काढणे आणि भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा कायम आहेत. पैसे काढण्यावरील मर्यादा कमी केल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यात, भर म्हणजे बहुतांश बँकांची एटीएम मशीन बंद आहेत. ग्राहकांच्या हातीच पैसा नसल्याने बाजारात सगळीकडे मरगळ आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम तसेच कॅश स्वीकारणारी मशीनही बंद आहेत. त्यामुळे पैसे काढणे व भरण्यासाठी स्वतंत्र मोठ्या रांगा लागत आहेत. बँकेच्या बाहेर उभारलेल्या मंडपांमुळे रांगेतील नागरिकांना दिलासा मिळत आहे. बँकेतील सगळीच काउंटर सुरू नसल्याने त्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम मशीनमधील कॅश संपल्याने एटीएम मशीन बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले. मशीनमध्ये दुपारी ३ वाजता कॅश भरली जाईल. त्यानंतर, नागरिकांना पैसे मिळतील, अशी माहिती त्याने दिली. शिवाजी चौकातील एका सहकारी बँकेचे एटीएममशीन बंद आहे. बँकेत पासबुकएण्ट्री केली जात नाही. बँकेने प्रवेशद्वारावरच एक नोटीस लावली आहे. त्यात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा साडेचार हजारांऐवजी दोन हजार रुपये केल्याचे म्हटले आहे. या बँकेत दोन हजारांची नोट उपलब्ध होती. त्यामुळे ही नोट घेऊन बाजारात गेल्यास कोणीही सुटे देत नसल्याने त्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिक करत आहेत. हॉटेलचालक रेहान शेख यांनी सांगितले की, हॉटेलचा धंदा पार बसला आहे. जेवण व नाश्त्यासाठी येणारे ग्राहक सुटे पैसे नसल्याने परत जात आहेत. सुटे नसल्याने आमचाही नाइलाज होत आहे. (प्रतिनिधी)>भाजीपाल्याचे केवळ ११० ट्रक : कल्याण बाजार समितीत पूर्वी भाजीपाल्याचे १४० ट्रक येत असत. आता नोटाबंदीमुळे मालाची आवक घटली आहे. शुक्रवारी मालाच्या ११० गाड्या आल्या होत्या. सुटे पैसे नसल्याने त्याचा फटका व्यवहाराला बसत आहे. २५ टक्के व्यवहारात घट झाली आहे. उधारी किती दिवस चालवणार. रोखीचा व्यवहारच कमी झाला आहे. पैसा आला नाही तर बाजार ठप्प होऊ शकतो, अशी भीती समितीचे सभापती अरुण पाटील यांनी व्यक्त केली. >कामगारांना पगार द्यायचा कसा? : कंत्राटदार उल्हास जामदार यांनी सांगितले की, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा आणखी कमी केल्याने दोन हजारांची नोट बँकेतून मिळते आहे. परंतु, या रकमेचे सुटे पैसे बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे ही नोट काही कामाची नाही. बँक १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा देत नाही. या नोटा दिल्या तरच बाजारातील चलनकोंडी फुटू शकते. कामगारांना पगार कसा द्यायचा, अशी अडचण आमच्यासमोर आहे. >शाई लावून घेण्यास ‘त्यांचा’ नकारपोस्ट आॅफिसमधून पैसे काढण्यासाठी शुक्रवारी काही मुस्लिम महिला रांगेत उभ्या होत्या. बोटाला शाई लावून घेण्यास त्यांनी नकार दिला. नमाज पठण करताना अडचण येते, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
शेपटीसारख्या रांगा कायमच
By admin | Published: November 19, 2016 3:49 AM