पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे खातेवाटपाचे घोडे अडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:18 AM2019-12-31T04:18:09+5:302019-12-31T06:47:15+5:30
गृह खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
- अतुल कुलकर्णी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पक्षांतर्गत वादांमुळे खातेवाटप लांबणीवर पडले आहे. गृह खात्यावरून राष्ट्रवादीत, तर काँग्रेसमध्ये महसूल खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे समजते.
कोणत्या पक्षाकडे कोणते खाते, हे आधीच ठरलेले आहे. मात्र कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत जोरदार ओढाताण आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना गृह व दिलीप वळसे यांना कामगार खाते द्यायचे ठरविले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन, जयंत पाटील यांना जलसंपदा, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, नवाब मलिक यांना राज्य उत्पादन शुल्क आणि वक्फ, जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण, राजेंद्र शिंगणे यांना वैद्यकीय शिक्षण, तसेच राजेश टोपे यांना उच्च व तंत्रशिक्षण ही खाती दिली जातील, असे समजते.
मात्र या खातेवाटपावरून मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अनिल देशमुख यांना गृह खाते देणे कोणालाच मान्य नाही. जयंत पाटील यांनी गृह खाते घ्यावे, असा आग्रह शरद पवार यांनी केला होता; पण त्यांना जलसंपदा खाते हवे आहे. नवाब मलिक यांनी कामगार खात्यावर दावा सांगितला आहे. उत्पादन शुल्क खाते वळसे पाटील यांना देण्यास तयार आहेत. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायऐवजी जलसंपदा व सार्वजनिक आरोग्य हवे आहे. भुजबळही अन्न व नागरी पुरवठा खात्यावर समाधानी नसल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, दुग्धविकास व पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण ही खाती असतील. महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहील, असे कळते. अशोक चव्हाण यांना ऊर्जा वा सार्वजनिक बांधकाम खाते हवे आहे, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांनी बांधकाम विभागावर दावा सांगितला आहे.
शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांना पर्यावरण व सांस्कृतिक कार्य खाते मिळेल, हे जवळपास नक्की आहे. मंत्रिपदे न मिळाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेत नाराजी आहे. आपले बंधू सुनील राऊत यांना मंत्री न केल्याने शपथविधीला गैरहजर राहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी दाखवून दिली. प्रणिती शिंदे यांना मंत्री न केल्याने सोलापूर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पश्चिम विदर्भाला स्थान न दिल्याने तेथील लोकांमध्येही नाराजी आहे.
संग्राम थोपटे यांना मंत्री न केल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्तेही संतापले आहेत. तेथील काही नगरसेवक तर राजीनामा देण्याची भाषा करीत आहेत. माजलगावचे (बीड) राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेही त्यांना मंत्री न केल्याने संतापल्याचे बोलले जाते. ते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आपली नाराजी बोलून दाखवणार असल्याचे समजते.
मंगळवारी तिढा सुटेल
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे सर्व मंत्री, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच पक्षांतर्गत खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.