मनोहर कुंभेजकर,मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघापुढील जटिल समस्यांचा गुंता दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरी समस्यांसह येथील वाहतूककोंडीने उग्र स्वरूप धारण केले असून, नागरिकांचा अधिकाधिक वेळ वाहतूककोंडीतच जात आहे. त्यामुळे प्रथमत: येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणे हे येथील लोकप्रतिनिधींसमोरील आव्हान असून, महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा गाजणार आहे.शिवसेनेचे खासदार गजानन कीर्र्तिकर यांचा मतदार संघ म्हणून उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघ ओळखला जातो. विलेपार्ले ते थेट मालाड पूर्व-पश्चिमच्या काही भागापर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि सुमारे २५ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. या मतदार संघात दिंडोशी, गोरेगाव, अंधेरी(पूर्व), वर्सोवा, अंधेरी(प), अंधेरी(पूर्व), जोगेश्वरी(पूर्व) हे सहा विधानसभा मतदार संघ येतात. दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी महापौर म्हणून सुनील प्रभू हे शिवसेनेचे आमदार म्हणून नेतृत्व करतात. महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर या गोरेगाव विधानसभेच्या आमदार म्हणून नेतृत्व करतात. राज्याचे उद्योगमंत्री आणि विधानपरिषद आमदार सुभाष देसाई हे गोरेगावचे रहिवासी आहेत. वर्सोवा विधानसभेच्या आमदार भारती लव्हेकर, तर भाजपाचे अंधेरी(प) विधानसभेचे आमदार अमित साटम, अंधेरी(पूर्व)विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून रमेश लटके, जोगेश्वरी(पूर्व)विधानसभेचे आमदार आणि म्हणून गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे येथील लोकांचे प्रतिनिधी आहेत.>प्रचाराचे मुद्देमराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असे सर्व समाजाचे नागरिक उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात वास्तव्य करतात. सद्यस्थितीत नागरीसुविधा पुरवण्यावर येथील लोकप्रतिनिधींनी भर दिला असला, तरी एसआरए योजनेंतर्गत झोपड्यांचा पुनर्विकास, अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचा रखडलेला पुनर्विकास आणि त्यामुळे रहिवाशांची होणारी होरपळ, सीआरझेडमुळे रखडलेला जुहू आणि वेसावे कोळीवाड्यांचा विकास, वाहतूककोंडी, त्यातच मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाढती वाहतूककोंडी, वाढती अनाधिकृत बांधकामे, खड्डेमय रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पालिकेच्या रुग्णालयांची कमतरता, शौचालयांची कमतरता, पावसाळ्यातली अर्धवट नालेसफाईअभावी तुबलेल्या गटारांमुळे साचणारे पाणी, काही भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हे येथील महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे असणार आहेत.अंधेरी (प.) : रेल्वे स्थानक परिसर, जेव्हीपीडी जंक्शन, वर्सोवा लिंक रोड येथे होणारी वाहतूककोंडी, डी.एन. नगर, न्यू डी. एन. नगर, आंबोली येथील इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकासामुळे रहिवाशांची होणारी घुसमट, अंधेरी(प)रेल्वे परिसर आणि येथील चप्पल गल्ली, एसव्हीरोड, चारबंगला मार्केट परिसर येथे होणारे पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाढती अनधिकृत बांधकामे, नेहरूनगर येथील झोपडपट्टी आणि विभागातील अन्य झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, काही भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पुरातन असलेल्या गिल्बर्ट हिलचा पर्यटन स्थळ म्हणून विकास, जेव्हीपीडी जंक्शनवर होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता, नव्या उड्डाणपुलाची गरज, कूपर येथील शवविच्छेदन केंद्रात सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या येथे आहेत.अंधेरी (पूर्व) : सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरारातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण, मरोळ बाजाराची दैनावस्था, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सबवेत होणारी वाहतूककोंडी, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पालिकेच्या सुसज्ज हॉस्पिटलची गरज, अंधेरी-कुर्ला रोड येथील मेट्रोच्या खाली असलेल्या रस्त्यांची झालेली दैनावस्था, सहार गावात ईस्ट इंडियन सेंटरची गरज अशा अनेक समस्या येथे आहेत.जोगेश्वरी (पूर्व) : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि जोगेश्वरी सबवेत, जोगेश्वरी(पूर्व)रेल्वे स्थानक, आरे, बिंबीसारनगर सर्व्हिस रोडवर होणारी वाहतूककोंडी, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, आरे येथील आदिवासी पाड्यात मूलभूत सुविधांचा अभाव, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, नव्या महाविद्यालयाची गरज, आरे येथील मेट्रो कार शेडवरून रंगलेला कलगीतुरा, आरे येथील गेली तीन वर्षे बंद असलेले आणि पालिकेकडे हस्तांतरित न झालेले रुग्णालय, ना हरकत प्रमाणपत्रामुळे आरेत सुविधांचा अभाव, महाकाली गुंफा आणि जोगेश्वरी पर्यटन स्थळ म्हणून झाला नसलेला विकास, अग्निशमन केंद्राची गरज, विकलांगांसाठी सुविधांचा अभाव, पर्जन्यजल वाहिन्यांची कमतरता आणि पालिकेची सेंट झेवियर्स शाळेजवळील तयार असलेली, पण सुरू न झालेली मंडई अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.वर्सोवा : वेसावा कोळीवाड्यांचा सीआरझेडमुळे रखडलेला विकास, वेसावे खाडीतील गाळ काढण्यास बंदर खात्याला अनेक वर्ष मिळालेला नसलेला मुहूर्त, सात बंगला चौपाटीचे पर्यटन केंद्र करण्याचा शासनाच्या घोषणेप्रमाणे वेसावे बंदरावर पर्यटन केंद्राची गरज, वेसावे येथील मच्छीमारांना शासनाकडून न मिळालेला डीझेल परतावा, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, अग्निशमन केंद्राची गरज, जयप्रकाश रोड आणि लिंक रोडवर होणारी वाहतूककोंडी, सुसज्ज मार्केटचा अभाव, फेरीवाल्याचे अतिक्रमण, काही भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, झोपडपट्ट्यांचा रखडलेला पुनर्विकास, जयप्रकाश रोड आणि लिंकरोडवरील अवैध पार्किंग आणि त्यामुळे होणारी मोठी वाहतूककोंडी, अंधेरी शहाजी राजे क्रीडा संकुलात पालिकेच्या नाट्यगृहाच्या निर्मितीला अजून शासनाची मिळालेली नसलेली परवानगी. सुसज्ज प्रसूतिगृहाची मागणी अशा अनेक समस्या येथे आहेत.>दिंडोशीपश्चिम द्रुुतगती महामार्ग, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, कुरार गाव येथे होणारी वाहतूककोंडी, कुरार परिसरात खुलेआम होणारी ड्रग्ज विक्री आणि वाढती गुन्हेगारी, सुसज्ज रुग्णालयाचा आणि महाविद्यालयाचा अभाव, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पालिकेच्या पी(उत्तर)पालिका विभाग कार्यालयाच्या विभाजनाची गरज असून, नवीन विभाग कार्यालयाची गरजेची असलेली निर्मिती, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, न्यू म्हाडा येथे नव्या पोलीस ठाण्याची गरज आहे.गोरेगावलिंक रोड आणि गोरेगावचा सावरकर पूल, गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूककोंडी, गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक परिसरातील गुरांच्या बाजाराच्या मोकळ्या झालेल्या जागी बेस्ट स्थानक आणि शासकीय कार्यालयाची रखडलेली निर्मिती, पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांचे असलेले अतिक्रमण, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, शौचालयाची असलेली कमतरता, कमी दाबाने पाणीपुरवठा, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सिद्धार्थ हॉस्पिटलच्या जागेत ३०० खाटांच्या सुसज्ज हॉस्पिटलची गरज, ओशिवरा नदीच्या पात्रात झालेले अतिक्रमण आणि नदीची झालेली दैनावस्था या येथील समस्या आहेत.
वाहतूक कोंडीने घेतले उग्र स्वरूप
By admin | Published: January 17, 2017 2:32 AM