मुंबई : मद्यधुंद अवस्थेत एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या ठाण्याच्या चार तरुणांना उच्च न्यायालयाने हटके निकाल देत चांगलाच धडा शिकवला. पुढील सहा महिने प्रत्येक रविवारी तब्बल आठ तास सार्वजनिक रस्ता साफ करण्याची शिक्षा न्यायालयाने या चौघांना ठोठावली.ठाण्यातील पाचपाखाडीचे चार तरुण अंकित जाधव, सुहास ठाकूर, मिलिंद मोरे आणि अमीत अडखळे यांच्यावर गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात ठाणे पोलिसांनी विनयभंग आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठासमोर होती. तक्रारदाराबरोबर सामंजस्याने हा वाद सोडवण्यात आल्याचे म्हणत या चौघांनीही हे आरोप रद्द करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले. या चौघांनाही असेच सोडता कामा नये. त्यांच्यावरील एफआयआर जरी रद्द केला तरी त्यांना त्याऐवजी काहीतरी सामाजिक सेवा करावीच लागेल, असे म्हणत खंडपीठाने पुढील सहा महिने दर रविवारी या चौघांनाही तब्बल आठ तास सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई करण्याचे आदेश दिले. हे चौघेही ही समाजसेवा करतात की नाही, यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याला लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)दसरा मिरवणुकीत सहभागी असलेल्या महिलेचा या चौघांनीही विनयभंग केला. यांना अडवणाऱ्या माणसाला चौघांनी मारहाण केली. घटनेच्या वेळी हे चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे या चौघांवरही विनयभंग आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
विनयभंग करणाऱ्या ठाण्यातील चौघांना ‘रस्तेसफाई’ची शिक्षा
By admin | Published: January 08, 2016 3:50 AM