उदगीर (जि. लातूर) : राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट केला़ या सोहळ्यात एक लाख वऱ्हाडींची पंगत उठली़ पंगतीला बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतंत्र बाटलीबंद पाणी हे या लग्नाचे वैशिष्ट्य होते. गोविंद केंद्रे यांच्या मुलाचा शनिवारी सायंकाळी राजेशाही थाटात विवाह सोहळा पार पडला़ केंदे्र यांचा मतदारसंघ असलेला उदगीर भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना येथे या शाही सोहळ्याची चर्चा रंगत होती़ तीस एकराहून अधिक क्षेत्रावर उभारलेला खुला मंडप, भव्यदिव्य स्वागतद्वार, विवाहमंच अन् त्यावरील रोषणाई, डोळे दिपवणारी प्रकाशव्यवस्था, विवाहानंतर झालेली आतषबाजी या सर्व उधळपट्टीचे सत्ताधारी मंत्री साक्षीदार राहिले़ विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजयकुमार देशमुख, खासदार प्रीतम मुंडे, डॉ़ सुनील गायकवाड यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी आमदारांची या सोहळ्याला उपस्थिती होती़ ‘त्या’ सोहळ््याची आठवणसन १९७२-७३च्या भीषण दुष्काळात सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाला देखील अकलूज येथे लक्षभोजनाचा थाट मांडला गेला होता. त्यावेळी वरपिता ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर सर्व स्तरावर टीकेचा भडिमार झाला होता. याची आठवण अनेकांना झाली.आपण समाजकारण व राजकारण करीत असताना ७ हजारांपेक्षा अधिक जणांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलो़ त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व आपल्याला एकूलता एक मुलगा असल्याने असा सोहळा घ्यावा लागल्याचे गोविंद केंद्रे यांनी विवाह समारंभाच्या प्रारंभी निवेदनात सांगितले़मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली असून लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे दुष्काळाच्या खाईत सापडले आहेत़ अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे़ लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी येत आहे़ परंतु, भाजपा नेत्यांनाच याचा विसर पडलेला दिसून येत आहे़
मुलाच्या लग्नात भाजपा नेत्याचे शाही लक्षभोजन
By admin | Published: April 17, 2016 3:42 AM