सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सिंगल (एकल) वॉर्डनुसार होणार असल्याने रिपाइं, मनसे, बीएसपी, भारिप आदीसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात उत्सवाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून नाराजीचा सूर निघत आहेत. सिंगल वॉर्डमुळे लहान पक्षांना फायदा होणार असल्याने, इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असलेतरी, पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, महापालिकेवर शिवसेना व मित्र पक्षाची सत्ता आहे. तसेच महापौर पदाच्या निवडणुकी पूर्वी स्थानिक साई पक्षाचे ११ नगरसेवक भाजप मध्ये विलीन झाल्याने, भाजपचे महापालिकेत पूर्ण बहुमत आहेत. मात्र सिंगल वॉर्ड रचनेमुळे साई पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे संकेत पक्षाच्या आशा इदनानी यांनी दिले. सिंगल वॉर्डमुळे मोठ्या पक्षा पेक्षा लहान पक्षाला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, रिपाइंचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव, भारिपचे शेषराव वाघमारे, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, बीएसपीचे प्रशांत इंगळे आदींनी सिंगल वॉर्ड रचनेचे स्वागत केले. तसेच त्यांच्या नगरसेवक संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली.
शहरात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्थानिक ओमी कलानी टीम, स्थानिक साई पक्ष, रिपाइं, मनसे आदींची शक्ती कमी अधिक प्रमाणात आहेत. आपसातील आघाडी नंतर, कोणाची सत्ता महापालिकेवर येते. हे सांगणे कठीण आहे. गेले दीड शतक महापालिका सत्तेची चाबी स्थानिक साई पक्षाकडे राहिली असून पक्षाचे नेते जीवन इदनानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले. साई पक्षाने सुरवातीला दोन वेळा शिवसेनेला पाठिंबा देऊन पक्षाला लिलाबाई अशान व आशा इदनानी यांच्या रूपाने दोन वेळा महापौर पदासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद पदरात पाडून घेतले. त्यानंतर भाजपला पाठिंबा देऊन उपमहापौर पदासह अन्य पदे पक्षाकडे ठेवण्यात इदनानी याना यश आले. त्यानंतर इदनानी यांनी स्वतःसह अन्य नगरसेवकांसह भाजपात समाविष्ट झाले. मात्र पुन्हा पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्रपने निवडणूका लढण्याचा मानस त्यांचा असल्याचे बोलले जाते.
भाजप-शिवसेनेत चिंतेचे वातावरण
सिंगल वॉर्डाचा फटका भाजपसह शिवसेनेला यापूर्वी बसला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या २० च्या पुढे गेली नव्हती. यावेळी सिंगल वॉर्डाचा फायदा रिपाइं, मनसे यांच्यासह स्थानिक साई पक्ष, ओमी कलानी, अपक्ष यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. पक्षाचे सर्वच स्थानिक नेते जुळवाजुळव करायला निघाल्याचे चित्र शहरात होते.