नाणे : कोपर्डी (अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खूनप्रकरणी निषेध करण्यासाठी कामशेत येथे रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शासन व पोलीस यंत्रणेने सर्वतोपरी प्रयत्न करावे, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कामशेत येथील साईबाबा चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी येथील पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी ‘फाशी द्या, फाशी द्या,आरोपींना फाशी द्या’, ‘महिलाओं के सन्मान में आरपीआय मैदान में’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा सदस्य समीर जाधव, संतोष कदम,रुपेश गायकवाड,महेंद्र वंजारी, गौतम निकाळजे, नागेश ओव्हाळ, विकास गायकवाड यांनी संयोजन केले होते. (वार्ताहर)
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आरपीआयचा मोर्चा
By admin | Published: July 23, 2016 1:57 AM