“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 07:11 PM2024-10-30T19:11:16+5:302024-10-30T19:14:07+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Smita Patil on Ajit Pawar : तासगाव येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत केलेल्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकणात खुल्या चौकशीसाठीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर सभेत केले. तसेच आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनीही याबाबत आता भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी तासगावच्या कवठे महांकाळ येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली. माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर. आर. पाटील यांनी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर आता आर. आर. पाटील यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांनी साडे नऊ वर्षानंतर मनातील खदखद व्यक्त केली आहे, असं स्मिता पाटील म्हणाल्या.
"आबांच्या जाण्यानंतर आमच्या कुटुंबावर आणि तासगाव-कवठे महांकाळमधील जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आमच्या आईने कधीही राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नव्हता. पण आबा गेल्यानंतर मी आणि रोहित लहान असल्याने आईवर अनावधानाने ती जबाबदारी आली. १० वर्षं अतिशय उत्तम पद्धतीने तिने कार्यभार सांभाळला. तो कारभार सांभाळत असताना रोहितने वेळोवेळी त्यांना मदत केली. एक बहीण आणि शरद पवार गटाची कार्यकर्ती म्हणून रोहित भरघोस मतांनी विजयी होईल असा मला विश्वास आहे," असं स्मिता पाटील यांनी म्हटलं.
"कुटुंबीयांना ते ऐकून फार वाईट वाटलं. फक्त कुटुंबीयच नाही तर तासगाव कवठे महांकाळमधील जनता, महाराष्ट्रातील आबाप्रेमींना त्याबद्दल फार वाईट वाटलं. आबांना जाऊन साडे नऊ वर्षं झाली आणि आता अजित पवारांनी आता मनातील खदखद व्यक्त केली. आम्ही अजित पवारांकडे वडील या नात्याने पाहतो. आबा आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. त्यामुळे आबांवर भ्रष्टाचाराच एकही आरोप नाही," असेही स्मिता पाटील म्हणाल्या.
काय म्हणाले अजित पवार?
"२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतले आणि आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल दाखवली. एसीबीमार्फत माझी खुली चौकशी करण्याचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले होते. मला ही गोष्ट कळल्यानंतर दुःख वाटले. आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापल्याची भावना निर्माण झाली," असं अजित पवार यांनी म्हटलं.