पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी राज्यातील ३९ साखर कारखान्यांना बुधवारी (दि. ३०) रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावण्यात आले. तर, १३५ कारखान्यांना तुमच्यावर आरआरसी कारवाई का करु नये अशी नोटीस देण्यात आली आहे. त्या नोटीशीवर येत्या १ आणि २ फेब्रुवारीला साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील केवळ ११ साखर कारखान्यांनी १५ जानेवारी अखेरीस शेतकऱ्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर, १८० कारखान्यांनी ० ते ९९ टक्के रक्कम थकीत ठेवली आहे. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपये थकीत आहेत. त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि. २८) साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्यावेळी साखर आयुक्तांनी थकबाकी असलेल्या कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले होते. साखर आयुक्तालयाने शून्य ते १५ टक्के थकबाकी असलेल्या ३९ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. यातील १२ कारखान्यांनी १५ जानेवारी अखेरीस एफआरपीचा एकही पैसा शेतकऱ्यांना दिलेला नाही. या कारवाईमुळे थकबाकीदार कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांची देणी वसुल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यानुसार कारखाना हद्दीतील जिल्हाधिकाऱ्यांना मालमत्ता विक्रीचे अधिकार आहेत. आरआरसी कारवाईनंतर जिल्हाधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी संबंधित साखर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणता येते. याशिवाय राज्यातील १३५ साखर कारखान्यांना तुमच्यावर आआरसी कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे आणि सोलापूर या विभागातील कारखान्यांची सुनावणी येत्या १ फेब्रुवारीला तर, उर्वरीत महाराष्ट्रातील कारखान्यांची सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतरही संबंधित कारखान्यांनी थकबाकी न दिल्यास त्यांच्यावर देखील आरआरसी कारवाई करण्यात येईल, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले. --------------------------
१५ जानेवारी अखेरीस शून्य एफआरपी दिलेले कारखाने
कारखाना रक्कम कोटींततात्यासाहेब कोरे-वारणा ११६.०२देशभक्त आर.के - पंचगंगा ७४.३९किसनवीर भुईंज ६३.२७किसनवीर-प्रतापगड ८.४१किसनवीर-खंडाळा २२.३०विठ्ठल रिफाईंड शुगर-सोलापूर ४२.१५समृद्धी शुगर-जालना ४२.५६वैद्यनाथ-बीड ३२.६४त्रीधारा शुगर-परभणी १७.०६शैला अतुल शुगर-उस्मानाबाद ५.३२शंभू महादेव-उस्मानाबाद १०.३१पांगेश्वर-लातूर १७.८०