मुंबई - ग्रामीण भागातील तंटे पोलिसांपर्यंत येण्यापूर्वीच सोडविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव संकल्पना आघाडी सरकार पुन्हा कार्यान्वित करणार आहे. रिक्त पदांमुळे राज्यातील पोलिसांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आर.आर. आबांनी गृहमंत्रीपदी असताना ही योजना प्रत्यक्षात आणली होती.
रिक्त जागांमुळे पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी तंटामुक्त समित्या पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. आघाडी सरकारने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 15 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त अभियानाला सुरुवात केली होती. या संकल्पनेतून ग्रामीण भागातील अनेक तंटे सोडविण्यात आले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात यशही मिळाले होते. गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या होत्या. तसेच तंटामुक्त गावांना रोख पारितोषिक देखील देण्यात येत होते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावाचा विकास करण्यास मदत मिळत होती.
दरम्यान 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तंटामुक्त गाव हे अभियान थंडावले. किंबहुना अनेक गावांत तंटामुक्त समित्या अस्तित्वातही राहिल्या नाही. आता आघाडी सरकारने या समित्या पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील तंटे सोडविण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल असं मत ग्रामीण भागातील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.