विशेष प्रतिनिधी ।मुंबई : नोटाबंदीनंतरच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या टोल वसुलीची नुकसान भरपाई म्हणून १४२ कोटी रुपये एवढी रक्कम टोल आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला झाल्यानंतर ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात मुंबईसह विविध ठिकाणचे टोलनाके बंद करण्यात आले होते. या नाक्यांवर नोटाबंदीनंतर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आणि अप्रिय घटना घडू नये म्हणून टोल नाके काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यात वांद्रे-वरळी सीलिंक, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांचाही समावेश होता.या निर्णयामुळे मुंबईतील टोल आॅपरेटर्सचे १०० कोटींंचे तर राज्यातील अन्य आॅपरेटर्सचे ४२ कोटींचे नुकसान झाले. जेवढे दिवस टोलनाके बंद होते तेवढा कालावधी आॅपरेटर्सच्या करारांतर्गत वाढवून द्यावा, असा प्रस्ताव आला. आॅपरेटर्सनी तो अमान्य केला. शेवटी आज त्यांना १४२ कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या रकमेची भरपाई केंद्राने द्यावी, अशी विनंती राज्य शासनाने केली आहे. केंद्राने अद्याप त्या बाबत निर्णय दिलेला नाही. त्या आधीच राज्याने सदर रक्कम आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे.
नोटाबंदीमुळे राज्याला १४२ कोटींचा फटका, ‘टोल आॅपरेटर्स’ना सरकारी तिजोरीतून पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 4:06 AM