राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीला एकूण 235 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला 50 चा आकडाही ओलांडता आला नाही. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत गेमचेंजर ठरली ती 'लाडकी बहीण योजना'. महायुतीला मिळालेल्या या महाविजयानंतर, आज मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासठी लाडक्या बहिणींनी वर्षा निवास्थानी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या लाडक्या बहिणींचे वर्षा निवासस्थानी स्वागत करत आभार मानले. तसेच त्यांच्याशी संवाद साधताना एक मोठी घोषणाही केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी -शिंदे म्हणाले, "लाडक्या बहिणींनी या राज्यात इतिहास घडवला आहे. या राज्यात आपण गेले दोन अडीच वर्ष जी विकास कामे केली, ज्या कल्याणकारी योजनांवर काम केले, यांत सर्वात सुपरहीट झाली ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. यावेळी, मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. यात काही लोकं फिट येऊन पडले, काही लोक चक्कर येऊन पडले," असा टोलाही त्यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.
"याठिकाणी एवढेच सांगतो की, माझ्या लाडक्या बहिणींच्या मुळे एक अद्भूत आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. म्हणजे, विरोधी पक्षांकडे विरोधीपक्ष नेता बनवण्या एवढे संख्याबळही राहिले नही. तुम्ही एवढं साफ करून टाकलं." अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी लाडक्या बहिणींचे कौतुक केले.
...आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले -शिंदे पुढे म्हणाले, तुम्ही एवढे मतदान केले की, संपूर्ण राज्यात लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले. त्यांना सुधरलेच नाही, समजलेच नाही. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. आपण येथे मला शुभेच्छा द्यायला आलात, माझे अभिनंदन करायला आलात, मी आपल्याला एवढेच सांगतो की, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. खंबीरपणे उभा आहे."
लाडकी बहिण योजनेसंदर्भात बोलताना शिंदे पुढे म्हणाले, "ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागायला हवा. हे मनात ठेऊन आम्ही ही योजना सुरू केली. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे." एवढेच नाही तर, आता तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार आहोत, त्याचाही निर्णय आपण घेतला आहे," असेही यावेळी शिंदेंनी यांनी सांगितले.
तुम्ही मतदान करताना घेतलेला निर्णय अत्यंत यशस्वी झाला आहे. तुम्ही समोरच्या लोकांना डम्पिंगमध्ये टाकून दिलं विरोधकांना, हा नेत्रदीपक विजय आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी यांनी नाव न घेता विरोधकावर निशाणा साधला.