औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्ती, संस्था सरसावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त ८२२ विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्यासाठी प्रति महिना १,१०० रुपये दिले जाणार आहेत. त्यातील पहिल्या महिन्याचा निधी मंगळवारी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलगुरू फंडातून १० लाख रुपये दिले होते. मुंबईतील ‘केअरिंग फें्रड्स’ या संस्थेचे निमेषभाई सुमती यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणार असाल, तर २२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले.यानुसार डॉ. काळे यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून जेवणाऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी घेतली. तसे पत्रही ‘केअरिंग फें्रड्स’ संस्थेला दिले. त्यानंतर संस्थेने तात्काळ १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केला. उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा अहवाल दिल्यानंतर संस्था देणार आहे.
मुंबईतील दानशूरांची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना २८ लाख रुपयांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 4:37 AM