मुंबई : भारतीय सैन्य दलातील शहिदांच्या कुटुंबीयांचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख करतानाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केली.‘वन फार आॅल अॅण्ड आॅल फार वन’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार हेमामालिनी, आमदार आशिष शेलार, निवृत्त मेजर जनरल राज सिन्हा, महावीर चक्र विजेते विंग कमांडर जगमोहन नाथ यांच्यासह विविध निवृत्त लष्करी अधिकारी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाºया शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे. त्यासाठी शहिदांच्या कुटुंबीयांच्या अनुदानात दुपटीने वाढ करतानाच त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात आले आहे. याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणाºयांच्या कुटुंबीयांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नितीन गडकरी म्हणाले, आपल्या तिन्ही सेना दलातील सैनिक अतिशय प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी सज्ज राहतात. प्रसंग आल्यास हौतात्म्यही पत्करतात. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अंतर्गत नक्षलवाद असो की सीमेवरील लढाई असो, सैनिकांचे योगदान विसरता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच भारताची अखंडता आणि एकात्मता अबाधित आहे. स्वराज्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला आहे. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. आता या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच अनुषंगाने या शुरांच्या त्यागाप्रती कृतज्ञ राहावे लागेल. त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागालाही अभिवादन करावे लागेल.मरणोत्तर शौर्यपदक धारकांच्या कुटुंबीयांचे सुधारित मासिक अनुदानपरमवीर चक्र (३३ हजार), अशोक चक्र (२६.५ हजार), सर्वोत्तम युद्धसेवा पदक (२५ हजार), महावीर चक्र (२५ हजार), किर्ती चक्र (२० हजार), उत्तम युद्धसेवा पदक (१७ हजार), वीर चक्र (१४.५ हजार), शौर्य चक्र (९ हजार), युद्ध सेवा पदक (८ हजार), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (५.५ हजार), मेन्शन इन डिस्पॅच (२.५ हजार), व्हिक्टोरिया क्रॉस (२६.५ हजार).महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत शौर्यपदक आणि सुधारित रक्कम लाखांतपरमवीर चक्र (६०लाख), अशोक चक्र (६०), सर्वोत्तम युद्धसेवा पदक (३६), महावीर चक्र (३६), किर्ती चक्र (३६), उत्तम युद्धसेवा पदक (२४), वीर चक्र (२४), शौर्य चक्र (२४), युद्ध सेवा पदक (२४), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (१२), मेन्शन इन डिस्पॅच (६), परम विशिष्ट सेवा पदक (४), अतिविशिष्ट सेवा पदक (२), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (१.५), विशिष्ट सेवा पदक (एक लाख), मेन्शन इन डिस्पॅच (५० हजार).
शहिदांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अनुदान, दोन हेक्टर जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:17 AM