आविष्कार देसाई , अलिबागरायगड किल्ल्याच्या विकासासाठी राज्य सरकारने तब्बल ५२० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून रायगड किल्ल्यासह परिसराचा कायापालट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या माध्यमातून जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नेण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीसह परकीय चलनातून आर्थिक सुबत्ता साधणे शक्य होणार आहे. रायगड किल्ल्याच्या विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी सादरीकरण केले. रायगडाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याची डागडुजी व्हावी यासाठी सर्वच स्तरांतून सरकारवर दबाव वाढत होता. रायगड जिल्ह्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून साकारण्यासाठी सरकारने मध्यंतरी रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव घेतला. रायगड किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय जागतिक पातळीवर नेल्यास रोजगाराच्या संधीसह आर्थिक प्रगती साधता येणार असल्याचे सरकारच्या लक्षात येताच, त्यांनी रायगड किल्ल्यासह परिसराच्या विकासासाठी प्रथम ५२० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता. मात्र अन्य खर्च वाढणार असल्याने त्याचा खर्च ६०९ कोटी रुपयांवर जाणार असल्याचे बोलले जाते. रायगड किल्ल्यासह परिसराच्या विकासासाठी रायगड जिल्हा परिषदेने आवाज उठविला होता. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची भेटही घेतली होती. राज्य सरकारने रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुमारे ६०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल.- सुरेश टोकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
रायगडसाठी ५२० कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2016 5:23 AM