मुंबई : हवाई वाहतूक तपास पथक (एआययू) व सीमा शुल्क विभागाने बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन स्वतंत्र कारवायांमध्ये परकीय चलनासह एकूण ६९ लाख रुपये जप्त करत, चौघा प्रवाशांना अटक केली.एका प्रवाशाकडे दोन हजारांच्या १,२५० नोटा होत्या. त्यांचे मूल्य २५ लाख रुपये आहे, तर हैदराबादहून मुंबईत आलेल्या तिघांकडून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व आॅस्ट्रेलियन चलनातील सुमारे ४४ लाख रुपये जप्त करण्यात आले. जेट एअरवेजच्या विमानातून हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या तिघा प्रवाशांंकडे परकीय चलन असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, झडती घेतली असता, शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख युसूफ पाशा यांच्या बॅगेत सौदी अरेबियाचे चलन असलेले एक लाख ३९ रियाल, संयुक्त अमिरातीचे ५ लाख ५६ हजार लाख दिराम व १,४००० आॅस्ट्रेलियन डॉलर आढळले. भारतीय चलनात त्याची किंमत ४३ लाख ९७ हजार ३५० रुपये इतकी आहे. (प्रतिनिधी)
मुंबई विमानतळावर ६९ लाख रुपये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 3:46 AM