हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून, त्यामुळे युतीचे सरकार स्थापन करायचे की नाही, याबाबतचा निर्णय होताना दिसत नाही. ही अनिश्चितता संपविण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच संपर्क साधण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यातील चर्चेचा तपशील या दोघांनीही उघड केलेला नाही. नितीन गडकरी यांचे शिवसेना नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे त्यांनीच आता दोन्ही पक्षांच्या चर्चेत मध्यस्थी करावी, अशी विनंती या बैठकीत फडणवीस यांनी केल्याचे समजते. महाराष्ट्रात पुन्हा भाजप-सेनेचे सरकार यावे, अशी मोहन भागवत यांची इच्छा आहे. त्यामुळे अन्य कामांत कितीही गुंतलेले असले तरी वेळात वेळ काढून मोहन भागवत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच संपर्क साधतील, असे समजते.शिवसेनेची कोंडीराष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विरोधी बाकावर बसण्यास तयार आहे, असे विधान करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेच्या प्रयत्नांतून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. काँग्रेस शिवसेनेस पाठिंबा देण्याची शक्यता नाही, असे त्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सांगितले होते. या स्थितीत सरसंघचालकांच्या मध्यस्थीने भाजप-सेनेतील तणाव निवळून युतीचे सरकार स्थापन मार्ग लवकर मोकळा होईल, अशी आशा असल्याचे सूत्रांनी सांगितले.