योगेश पांडे / नागपूरसंपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे केवळ मागील पाच महिन्यांतच पाच हजारांहून अधिक नव्या संघशाखांची भर पडली आहे. सत्ताबदल झाल्यानंतर किमान संघाचे तरी ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दैनंदिन संघ शाखांसोबतच साप्ताहिक मिलनावरदेखील संघ स्वयसेवकांचा भर दिसून येत आहे. २०१२ साली सुमारे ४३ हजार गावांमध्ये संघ शाखा होत्या. मार्च २०१५मध्ये देशभरात ५१ हजार ३३० शाखा होत्या. मागील वर्षी तेलंगणमधील भाग्यनगर येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली. यावेळी संघ शाखांची एकूण संख्या ५२ हजार १०२ असल्याची माहिती विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांच्याकडून देण्यात आली होती.पाच महिन्यांनंतर कोईम्बतूर येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. देशभरातील दैनंदिन संघ शाखांची संख्या ५७ हजार २३३ इतकी असल्याचे सहसरकार्यवाह व्ही. भागय्या यांनी रविवारी स्पष्ट केले. याचाच अर्थ २०१२ च्या तुलनेत १७ हजारांहून अधिक तर मागील पाच महिन्यांतच संघ शाखांत ५ हजार १३१ने वाढ झाली आहे.नवीन गणवेशाचा फायदा -मागील वर्षी नागौर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन गणवेशाची घोषणा झाली व विजयादशमीपासून स्वयंसेवक ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसू लागले. याचाच फायदा संघ शाखा वाढीसाठी झाला आहे, अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.90%शाखा युवकांच्याच-वेगवेगळ्या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षांखालील लोकांच्या शाखांची संख्या सुमारे ९० टक्के आहे. देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सात हजारांहून अधिक शाखा लागतात. २०१६ मध्ये एक लाखांहून अधिक तरुण संघाच्या प्राथमिक शिक्षा वर्गात सहभागी झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘अच्छे दिन’
By admin | Published: March 21, 2017 3:08 AM