RSS News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देशभर वाढत असून अनेक तरुण संघाशी जुळत आहेत. संघाच्या संकेतस्थळावर दरवर्षी ‘जॉईन आरएसएस’ म्हणून एक लाख लोकांचे विनंती अर्ज येतात. भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच आहे. सर्वांचे पूर्वज हे हिंदूच होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने मनमोहन वैद्य यांनी मीडियाशी संवाद साधला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशात एक चैतन्य आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले. अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्यात संघाविषयी गैरसमज होते. आता त्यांच्यातील भीतीचे वातावरण कमी होत आहे, असे वैद्य यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून संघाच्या विस्तारामध्ये मोठी वाढ
देशातील ९२२ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ९९ टक्के जिल्ह्यात संघाच्या संघाचे शाखा सुरू आहेत, तर ६५९७ तालुका ठिकाणी शाखा आहेत. मागील काही वर्षांपासून संघाच्या विस्तारामध्ये मोठी वाढ झालेली आहे. संघाचे काम वाढत असल्याने दहा ते पंधरा गावांचा समूह घेऊन मंडल तयार करण्यात आले असून ५८९८ मंडळांमध्ये सध्या शाखा सुरू आहेत. सध्या देशात ७३,१७७ नियमित शाखा सुरू आहेत. यात ६० टक्के शाखा ह्या विद्यार्थ्यांच्या तर ४० टक्के शाखा व्यवसायिक आणि नोकरदारांचे आहेत. अकरा टक्के शाखा तरुणांच्या आहेत. त्यामुळे तरुण वर्गाचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येते. नियमित शाखांशिवाय देशात २७ हजार ७७० साप्ताहिक मिलन शाखा सुरू आहेत, अशी माहिती वैद्य यांनी दिली.
दरम्यान, राम मंदिर प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात संघाचा व्यापक जनसंपर्क वाढलेला आहे या निमित्ताने ५ लाख ९८ हजार गावात १९ कोटी ३८ लाख लोकांशी संपर्क झाला. ज्यामध्ये ४४ लाख कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राम जन्मभूमी प्रतिष्ठान सोहळ्याचा उत्सव देशभरातील २२ लाख ६० हजार ठिकाणी साजरा करण्यात आला. ज्यात २७ कोटी ९४ लाख लोक सहभागी झाले. यामुळे समाजामध्ये ऊर्जेचे वातावरण निर्माण झालेले आहे. संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. शताब्दी वर्ष सुरू होण्याआधी अधिक संघाला अधिक बळकट करण्यावर भर असल्याचे वैद्य म्हणाले.