मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.
मोहन भागवत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोहन भागवत यांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबतचे मत मांडले. आताच्या घडीला या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पाहावा
ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पाहावा. सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. या चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. त्यामधून पूर्ण कलात्मकता दिसते. यासाठी बरेच संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळेच सत्य काय आहे याची जाण ज्यांना आहे त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार या अभिनेत्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत प्रतिक्रिया व्यक्त करताना, द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.