ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - महाराष्ट्राचे तुकडे करायची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व भाजपची इच्छा आहे आणि सध्या त्या दृष्टीने चाचपणी सुरु असल्याचे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य तोडण्याचं काम श्रीहरी अणेंपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जास्त करतंय असं सांगताना अणे जे म्हणाले ते त्यांचं स्वत:च डोकं नसून ते त्यांना बोलायला सांगितलं गेलंय असं ठाकरे म्हणाले. विदर्भाप्रमाणेच मराठवाडा स्वतंत्र करायला हवा या श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावर व राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेतले काही मुद्दे:
- छोटी राज्य असावीत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे आणि तीच भूमिका भाजप पुढे नेत आहे. अणे जे बोलले ते त्यांचं स्वतःच डोकं नाहीये तर त्यांना हे बोलायला सांगितलं गेलंय. मुळांत एखाद्या विषयावर कोणालातरी बोलायला लावून मग चाचपणी करायची ही संघाची जुनी पद्धत आहे. श्रीहरी अणे नागपूरचे, संघाच्या जवळचे, तेंव्हा संघाने त्यांच्या तोंडून हे विधान करवलं. आता ते अंदाज घेतील....
- अणेंच्या मागचा बोलवता धनी संघ आणि भाजप आहेत हे समजून घ्यायला हवं.
- संघाला जे साध्य करायचं होतं ते बोलून, अणे राजीनामा देऊन मोकळे झाले. आता विषयाला तोंड फुटलंय.
- आता हळूहळू भाजपचे मराठवाड्यातले छोटे छोटे नेते अशी विधानं करायला लागतील. राज्याचे तुकडे करायचे ही भाजपची आणि संघाची इच्छा आहे, अणे हे निमित्तमात्र आहेत.
- यावेळेला सर्वपक्षीय अंगावर आले म्हणून राजीनामा घेतला मग मागच्या वेळेला जेंव्हा ते विदर्भाविषयी बोलले तेंव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना का नाही एकत्र आले? कारण प्रत्येकाचे हितसंबध अडकलेले आहेत.
- विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे, राज्यापुढे इतके प्रश्न प्रलंबित आहेत अश्या वेळेला ही असली विधानं येतातंच कशी? प्रत्येक वेळेला श्रीहरी अणे अधिवेशनाच्या काळातंच कसे बोलतात? प्रत्येक वेळेला योगायोग कसा घडतो?
- मी माझ्या भाषणात बोललो होतो की महाराष्ट्राचे तुकडे करायची भाजपची इच्छा आहे. सध्या त्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे.
- यापुढे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्याला कानफटवून काढू.