लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी १ मार्चपासून सुरू केली होणार आहे. एका विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, असे प्राथमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीईसाठी अर्ज भरताना पालकांनी खबरदारी घेऊन अर्ज भरणे आवश्यक राहणार आहे.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.
दरम्यान, वंचित गटातील बालकांना आर्थिक उत्पन्नाची मर्यादा लागू नाही आणि ज्यांचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे, अशांचा आर्थिक दुर्बल घटकांत समावेश होतो, हे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पालकांनी अर्ज भरताना जास्तीत जास्त १० शाळांची निवड करायची असून, गुगल मॅपचा वापर करत घरापासून शाळेचे स्थान निश्चित करायचे आहे. यामध्ये पालकांना केवळ ५ वेळा स्थान निश्चित करता येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कागदपत्रांची ही माहिती प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आली आहे. निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यातील एक पुरावा ग्राह्य धरता येईल. याशिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटित महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.