मुंबई : अनधिकृत कर्णकर्कश सायरन आणि हॉर्नमुळे झोपेत येणारा अडथळा तसेच होणारा मनस्ताप पाहता राज्यात याविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय आरटीओकडून घेण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर या कारवाईला सुरुवात करत असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. यासाठी आवाजासहीत व्हिडीओ क्लिपसह तक्रार जनतेने दाखल करावी, असे आवाहन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. यासाठी परिवहन कार्यालयांचे पत्ते व ई-मेल आयडी www.mahatranscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. वरळी येथे राहणारे दिलीप निवेटिया यांनी पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे अनधिकृत कर्णकर्कश सायरन आणि हॉर्नविरोधात नुकतीच एक याचिका दाखल केली होती. अनधिकृत सायरन आणि हॉनमुळे मनस्ताप होत असून त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्याची नियमावली ठरवण्यात यावी,असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर लवादाकडून वाहनांवरील अनधिकृत सायरन तसेच हॉर्नच्या वापराबाबत राज्य परिवहन आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीसांना निर्देश दिले आहेत. माहिती मिळाल्यानंतर अनधिकृत हॉर्न आणि सायरन विरोधात कारवाई केली जाईल. यात वाहन दोषी आढळल्यास दोन हजार रुपये दंड आणि हॉर्न किंवा सायरन जप्त केला जाईल, असे सांगण्यात आले. हे निर्देश पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही असल्याने त्यांच्याकडूनही कारवाई केली जाईल.
कर्णकर्कश हॉर्नवर आरटीओ कारवाई करणार
By admin | Published: October 06, 2015 2:44 AM