नवी मुंबई :
वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी प्लेट लावून स्वतःला शासकीय कर्मचारी भासवणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये २६ वाहने हाती लागली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी प्लेट लावून मिरविणारे आरटीओच्या रडारवर आले आहेत.
खासगी अथवा ट्युरिस्ट वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशा प्लेट लावल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर वाहने घेतली जातात. त्याचाच फायदा इतर वाहनधारकांकडून घेतला जात आहे. स्वतःचे वाहन शासकीय कामकाजाकरता वापरासाठी असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
टुरिस्ट वाहनांचाही कारवाईत समावेश कोणत्याही प्रकारे शासकीय कामांसाठी या वाहनांचा वापर होत नसतानाही त्यावर महाराष्ट्र शासनाची पाटी लावली होती. त्यात खासगी तसेच ट्युरिस्ट वाहनांचा समावेश आहे. या सर्वांवर दंडाची कारवाई केली आहे. तर यापुढेदेखील अशा वाहनांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
टोल टाळण्यासाठी केला प्रताप काहीजण टोलवर फुकटात सुटण्याच्या उद्देशाने, वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हा प्रताप करतात. मात्र, त्यामुळे सर्वसामान्यांचीदेखील फसवणूक होण्याचा अधिक धोका असतो. तर अशा वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठीदेखील वापर होऊ शकतो. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी अशा प्लेटच्या वाहनांचा शोध घेऊन खातरजमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी नेमलेल्या पथकाने मागील तीन दिवसांत २६ वाहनांवर कारवाई केली आहे.