मुंबई : राज्यभरात दरवर्षी लाखो वाहनांची खरेदी होते. रस्त्यावरच्या वाहतुकीत अनेक गाड्यांची भर पडते. नियमांचे उल्लंघन होते. अपघात होतात. या सगळ्याचे नियमन करण्यासाठी राज्य परिवहन विभाग कार्यरत असतो. मात्र, या विभागाला ५०० अधिकाऱ्यांची चणचण भासत आहे. अधिकाऱ्यांच्या टंचाईमुळे विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा पडत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
राज्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक ते परिवहन आयुक्त अशी २ हजार २३५ पदे मंजूर आहेत. यातील अपर परिवहन आयुक्तांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक असे एकूण १ हजार ७३५ अधिकारी कार्यरत आहेत तर उर्वरित ५०० अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
रिक्त पदे असल्याने कामाचा ताण अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येतो. वाहन तपासणीपासून अनेक कामे त्यामुळे अडकून पडतात. शिकाऊ, कायमस्वरूपी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना, त्यांचे नूतनीकरण याशिवाय वाहनांशी संबंधित कामे घेऊन अनेकजण येत असतात. एकाच अधिकाऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या असल्याने कामांना वेग येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या अलीकडे ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या. यामध्ये १६६ आणि ३६४ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी बहुतेक अधिकारी कामावर रुजू झाले आहेत.
अनेक पदे रिक्त असल्याने जनतेला योग्य सेवा मिळत नाही. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. पात्र असूनही काहीजण पदोन्नतीपासून वंचित आहेत. - सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना
रिक्त पदांबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. - विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त