- सचिन भोसले
कोल्हापूर : राज्यातील २३ जिल्ह्यांत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहेत. त्यांचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तात्पुरता दिला आहे. त्यात कोल्हापूरचाही समावेश असून, गेल्या आठ वर्षांत हे पद रिक्तच असून, प्रभारींवरच ही जबाबदारी आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांचा कारभार असलेल्या या कार्यालयास प्रादेशिक परिवहन अधिकारी कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
परिवहन विभागांतर्गत २८ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे. त्यात नव्या आकृतिबंध कार्यक्रमात कोल्हापूर, सांगलीसाठी एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर सातारा, कऱ्हाडसाठी एक अशी दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यात कोल्हापूरचा कारभार तर गेल्या आठ वर्षांत प्रभारींवरच म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडेच आहे.
राष्ट्रीय, राज्य महामार्ग आणि तपासणी नाके आदींवर वाहन तपासणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येवरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभार सुरू आहे. कोरोनानंतर पदोन्नती, नवीन भरती प्रक्रिया आकृतिबंधानुसार पदेच भरलेली नाहीत.