सुमेध वाघमारे - नागपूरआॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आता आवश्यक असणार आहे. अन्यथा अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत निवडणूक आचारसंहितेचा भंग म्हणून निवडणूक आयुक्तांकडे प्रकरण पाठविण्यात येणार आहे.प्रचारांची रणधुमाळी रविवारपासून सुरू होणार आहे. जाहिरातबाजीला ऊत येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांना हात, कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, कपबशी, सिलिंडर असे आकार देऊन किंवा निवडणूक चिन्हांचे, उमेदवाराचे फलक लावलेली अशी वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौकाचौकांतून दिसून येणार आहे. विशेष म्हणजे, प्रचाराचे प्रभावी तंत्र मानले जाणारे प्रचाररथ तयार करताना वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नसते. वाहनांच्या बाह्य स्वरूपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात, तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील निवडणुकीपर्यंत आरटीओचे याकडे विशेष लक्ष नव्हते. परंतु आता याची अंमलबजावणी करण्याची सूचना परिवहन आयुक्तांनी केली आहे. ‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाच्या बाह्य रचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना अशा घटकांची तपासणी करून आरटीओकडून परवानगी दिली जाते, मात्र कालपर्यंत या संदर्भाची माहिती कुणालाच नव्हती.प्रचाराच्या तोंडावर माहिती देणारे पत्र परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना दिल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक कार्यक्रमात आरटीओच्या कर्मचाऱ्यांची लावलेली ड्युटी यात अशा दोषी वाहनांवर कारवाई करण्यास आरटीओला कितपत यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रचार रथावर आरटीओचा ‘वॉच’
By admin | Published: September 28, 2014 1:02 AM