मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. अशा वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून वाहन मालकांना त्याचा ताबा मिळावा यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालये (डेप्युटी आरटीओ) २८ मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाते. त्यामुळे याच शुभमुहूर्तावर वाहनांची खरेदी होतानाच वाहन मालकांना त्याचा ताबाही मिळावा यासाठी राज्यातील सर्व आरटीओ सुरू ठेवली जातात. या दिवशी आरटीओकडून वाहनांना नोंदणी क्रमांक दिला जातो. यातून आरटीओला चांगला महसूल मिळतो. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गुढीपाडव्याच्या दिवशी आरटीओ व डेप्युटी आरटीओ सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वेळेत उपस्थित राहून नोंदणी व कर वसुलीचे कामकाज करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांचा ताबा वाहन मालकांना मिळावा म्हणून १९ मार्चला शनिवारी तसेच २५,२६ मार्चला शनिवार व रविवार असे दोन्ही दिवस आरटीओ सुरू ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)दुय्यम निबंधक कार्यालयेही खुली गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी बरेच जण सदनिका, शेत जमिनी तसेच इतर खरेदी, व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. हे पाहता दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील ‘आरटीओ’ सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 3:57 AM