अकोला : महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात रेल्वेद्वारे प्रवास करण्यासाठी आता आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन अटी बंधनकारक केल्या आहेत.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी कर्नाटक राज्याच्या सिमावर्ती भागाती पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. आपल्या राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये, यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणार्या प्रवाशांसाठी किमान ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांनाही मुभा राहणार आहे. अशा प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९ योग्य वर्तनाचे अनुसरण करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.