मुंबई – महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून या किटचं वाटप करण्यात येते. आरोग्य विभागाकडून हा उपक्रमक राबवण्यात येतो. मात्र कुटुंब नियोजनासाठी देण्यात आलेल्या किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारावर आशा सेविका नाराज झाल्या असून भाजपा नेत्या चित्रा वाघही चांगल्याच भडकल्या आहेत.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) म्हणाल्या की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा. आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं. वर हे अजून..थोडी लाज ठेवा. मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनाही टॅग केले आहे. त्याचसोबत कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंगाचा समावेश सरकारने करून त्याची जनजागृती करण्याचे काम आशा वर्करना दिलयं या प्रकरणी भारतीय दंड विधान ३५४ प्रमाणे (मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य) डोक्यावर पडलेल्या या ठाकरे सरकारवर विनयभंगाचा गुन्हा तात्काळ दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.
लोकसंख्या वाढीबाबत आशासेविका घरोघरी जात महिलांचे समुपदेशन करतात. परंतु राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या किटनंतर त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रबरी लिंग समुपदेशनाच्या किटमध्ये दिल्याने ते घेऊन महिलांसमोर कसं जायचं? हा प्रश्न निर्माण झाल्याने आशा सेविका नाराज झाल्या आहेत. त्यात प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी रबरी लिंग देण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाचे अधिकारी या प्रकरणी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत.
आशा सेविकांमध्ये पसरली नाराजी
सरकारकडून देण्यात आलेल्या समुपदेशन कीटमध्ये ‘रबरी लिंग’ दिल्याने आशा सेविकांमध्ये नाराजी पसरली आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ते दिल्याचं सरकार सांगत आहे. परंतु आशा सेविका म्हणतात की, आम्ही जेव्हा गावोगावी जात महिलांना कुटुंब नियोजनाबद्दल सांगत असतो तेव्हा या किटची मदत घेतली जाते. मात्र आता त्यात रबरी लिंगाचा वापर करताना आम्हाला लाज वाटते. हे कुटुंब नियोजन कीट एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतानाही खूप विचित्र वाटतं. कुटुंब नियोजनाच्या या कीटमध्ये पुरुष आणि महिला या दोघांच्या रबरी लिंगाचा वापर समावेश करण्यात आला आहे.