कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी ढगाळ वातावरण आणि सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्याने किरणे केवळ मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचून ती लुप्त झाली. त्यामुळे अखरेच्या दिवशी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर पडून किरणोत्सव पूर्ण होईल, ही अपेक्षा फोल ठरली. अंबाबाईच्या किरणोत्सवाची मूळ तारीख ९, १०,११ नोव्हेंबर असली, तरी किरणोत्सव ८ तारखेपासूनच सुरू झाला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चरणापर्यंत, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी गळ्यापर्यंत आली होती. गुरुवारी सूर्यकिरणांची प्रखरतादेखील अधिक होती. त्यामुळे शुक्रवारी अखेरच्या दिवशी किरणे देवीच्या मुखावर पडून किरणोत्सव पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे मंदिरात भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती. मात्र, हवेतील धुलिकण, दवबिंदू आणि ढगाळ वातावरणामुळे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती. महाद्वारातून ४ वाजून ५० मिनिटांनी सूर्यकिरणे मंदिरात प्रवेश करताना त्यांची तीव्रता २३ हजार ५०० लक्स होती. जी किरणोत्सव पूर्ण होण्याच्या दृष्टीने कमी होती. किरणे गाभाऱ्यातील दुसऱ्या पायरीवर आली तेव्हा त्यांची तीव्रता केवळ ३८ लक्स इतकी होती. त्यामुळे किरणे पुढे सरकताना आणखी कमी होत गेली आणि ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचून ती लुप्त झाली. त्यामुळे यंदाचा किरणोत्सवही अपूर्ण झाला. किरणांचा प्रवास असा..महाद्वार : ४ वाजून ५० मिनिटेगरुड मंडप : ४ वाजून ५३ मिनिटेगणपती मंदिर : ५ वाजून ६ मिनिटेकासव चौक : ५ वाजून ३५ मिनिटेपहिली पायरी : ५ वा. ३८ मिनिटेदुसरी पायरी : ५ वाजून ३९ मिनिटेतिसरी पायरी : ५ वा. ४२ मिनिटेचरणस्पर्श : ५ वाजून ४४ मिनिटेगुडघ्यापर्यंत : ५ वाजून ४५ मिनिटेगळ्यापर्यंत : ५ वाजून ४९ मिनिटेआयुक्तांकडून अडथळ्यांची पाहणी; नोटीस काढणार किरणोत्सवात येणारे अडथळे पाहण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर स्वत: शुक्रवारी मंदिरात उपस्थित होते. गाभाऱ्याच्या बाहेर बसून त्यांनी किरणोत्सवाचा सोहळा पाहिला. यावेळी प्रा. मिलिंद कारंजकर यांनी किरणोत्सव मार्गाचे प्रेझेंटेशन आयुक्तांना सादर केले. त्यानंतर महाद्वारपासून ते मंदिरापर्यंत किरणोत्सवाच्या मार्गाची, अंबाबाईची मूर्ती आणि सूर्यकिरणांमध्ये अडथळा ठरणाऱ्या इमारतींची पाहणी केली. महापालिकेच्या पुढील सभेत हा विषय मांडून किरणोत्सव मार्गातील अडथळे काढून घेण्याची नोटीस काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत किरणे
By admin | Published: November 12, 2016 12:35 AM