कुडाळ : शिक्षणामुळेच परिवर्तन घडते, शिक्षणानेच विकास साधता येतो. त्यामुळे जीवनात शिक्षणाला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांनी चिकाटी व प्रामाणिकपणा ठेवून कष्ट करावेत. महत्त्वाकांक्षी बनून शिक्षण घ्या आणि विकास साधा. सध्याच्या शासनाने शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ केला असून, या जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. मी मात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाट शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले. पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजित देसाई, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, पाट सरपंच कीर्ती ठाकूर, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, विकास कुडाळकर, दिनेश साळगावकर, संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र रेडकर, कार्यवाह दिगंबर सामंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, सुनील सौदागर, आदी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास देसाई म्हणाले की, या पंचक्रोशीत पूर्वी शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्याने अनेकांना शिक्षण थांबवावे लागले होते. हे लक्षात घेऊन शिक्षण संस्थेने कार्य सुरू ठेवले. त्यामुळे येथे सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. संस्था यापुढेही शैक्षणिक विकासासाठी झटणार आहे. आमचे नेते जिल्ह्यातील जनतेच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने मदत करतात. हे पाट शिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी नारायण राणे यांनी केलेल्या मदतीवरून दिसून येते. नारायण राणे आपल्या पाठीशी राहिले याची जाण ठेवावी, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजित देसाई म्हणाले. इमारत उभी राहण्यासाठी मदत करणारे सुहास आजगांवकर, सुधीर मळेकर, अशोक सारंग, शाम सारंग, रामचंद्र रेडकर, मंदार प्रभू, नीलेश सामंत, आबा रेडकर, प्रमोद वेंगुर्लेकर, सिंधू नाईक, आदींचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थितीत सुधारणा झाली. नव्या इमारतीच्या दर्जाप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा वाढवा. (प्रतिनिधी)राणेंकडून भरघोस देणगीसंस्थेचे कार्यवाह दिगंबर सामंत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला भरघोस देणगी दिल्यामुळेच आम्ही ही भव्य वास्तू उभी करू शकलो. विद्यार्थ्यांना यापुढे चांगल्या प्रकारे शैक्षणिक सोयीसुविधा, उपक्रम आम्हाला घेता येणार आहेत .
शासनाकडून शिक्षणाचा बट्ट्याबोळ : राणे
By admin | Published: January 08, 2016 11:57 PM