नामदेव मोरे , नवी मुंबईमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील १०८६ कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणी ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, तसे दोषारोपपत्र त्यांना पाठविण्यात आले. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाने २६ कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केले असून, त्यामुळे बँकेचे ९७५ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य बँकेमध्ये २००८ ते २०१३ या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळाने नियम डावलून घेतलेल्या निर्णयामुळे बँकेचे नुकसान झाले. या प्रकरणी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिणकर यांची जून २०१४मध्ये चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. १५ महिने चौकशी केल्यानंतर पहिणकर यांनी १० सप्टेंबरला ७७ संचालक मंडळावर दोषारोपपत्र ठेवले. संचालक मंडळाने राज्यातील २६ साखर कारखान्यांना नियमबाह्यपणे ९७५ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांचे कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून उणे नक्त मूल्य, संचित तोटा व अपुरा दुरावा असताना हा कर्जपुरवठा केला गेला. कर्ज वसूल न झाल्याने बँकेला २९७ कोटी १४ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. १४ कारखान्यांना संचालक मंडळाने तारण तथा शासन थकहमी न घेता कर्जवाटप केले, कर्जदार संस्थांकडून ४७४ कोटी ६५ लाख २८ हजार रुपयांची कर्जवसुली झालेली नाही.
२६ साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप
By admin | Published: September 21, 2015 1:37 AM