- लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सत्ताधारी पक्षांपैकी एकाची भूमिका दोन तोंडांच्या गांडुळासारखी आहे, अशी टीका शिवसेनेचे नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी केली. राज्यात मध्यावधी निवडणुकांची सूतराम शक्यता नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. मुंबई महापालिकेत दोन दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला. त्यावेळी पंतप्रधानांचा ‘चोर’, असा उल्लेख करण्यात आला. तो योग्य नाही. आघाडी सरकारमध्येही वाद होते, पण ते असे कधी चव्हाट्यावर आले नाहीत. सत्ताधारी जनतेसमोर असे उघडपणे भांडण करतात, पण ठोस निर्णय मात्र काही घेत नाहीत. राजीनामे खिशात ठेवतात पण देत नाहीत, असा टोला शिवसेनेला लगावला. नागरिकांमधून थेट सरपंच निवडण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे. आघाडी सरकारनेही विलासरावांच्या काळात असा निर्णय घेतला होता, पण तो यशस्वी होणार नाही, असे लक्षात येताच अल्पावधीतच मागे घेतला होता. त्यामुळे काही निर्णय जनतेसाठी मागे घ्यावे लागतात, तशी भूमिका या सरकारमध्ये दिसत नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात पाच अध्यादेश काढले जातात, कोणाचाही कोणाला मेळ नाही. मुख्यमंत्री एक बोलतात, त्यावर दुसरे मंत्री दुसरेच बोलतात, अशी गोंधळाची स्थिती सरकारमध्ये आहे, असे पवार म्हणाले.सिंचन घोटाळ्यावर मौनजलसिंचन घोटाळ््यासंदर्भात पवार यांनी उत्तर न देता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बोलायला सांगितले. तटकरे म्हणाले की, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशी समितीला हवी असलेली माहिती आम्ही देत आहोत. जे सत्य असेल ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे, आम्ही त्यास तयार आहोत.