मुंबई : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांनी असा निर्णय घेतल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाइट, माध्यमे यांनी दिल्याने रविवारी काही काळ गोंधळ उडाला. त्यांचे अनुयायी, कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मात्र, ती अफवा असल्याचे लगेचच स्पष्ट झाले.आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त काही इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले. लोकमत डॉट कॉमसह, वेगवेगळ्या मराठी, इंग्रजी वेबसाइटवर ते झळकले. मात्र, ती अफवा असल्याचे स्पष्ट होताच, ते त्वरित तेथून काढून टाकण्यात आले, तसेच तेथे आंबेडकर यांची याबाबतची भूमिका मांडण्यात आली.मात्र, या वृत्तामुळे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले. वेगवेगळ्या वेबसाइटवरील या वृत्ताबाबत त्यांनी सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त केल्या. हे वृत्त खोडसाळ, बदनामी करणारे असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले, तसेच ते जाणीवपूर्वक पसरविण्यात आल्याचे मत कार्यकर्ते मांडत होते.या विषयावर भाष्य करताना आंबेडकर यांनी दिल्ली प्रदेश रिपब्लिकन सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टिष्ट्वट करून दिली. मी गेले आठ-दहा दिवस मुंबईतच आहे, तरीही अशा बातम्या का पसरविण्यात आल्या ते कळत नाही. वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असल्यानेच असा प्रकार करण्यात आला असावा. मात्र, याकडे जनतेने लक्ष देऊ नये, असे आवाहनही आनंदराज आंबेडकर यांनी केले.काही राजकीय पक्षांचे षड्यंत्र असल्याचा आरोपआनंदराज आंबेडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या खोट्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्या विरोधात आंबेडकर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असल्याने अस्वस्थ झालेल्या राजकीय पक्षांनी हे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला रोखणे आता शक्य होणार नाही, अशी भूमिका या विषयावर प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मांडली.
आनंदराज आंबेडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 6:02 AM