सप्तश्रृंगगड (नाशिक) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी फनिक्युलर ट्रॉलीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर चुकीची माहिती व ट्रॉलीच्या चाचणीचा व्हिडीओ अज्ञातांनी व्हायरल केल्याने, अचानक भाविकांची गर्दी वाढली आहे.दूरवरच्या, तसेच परराज्यातील भाविकांनी आपल्यासोबत वृद्ध माता-पिता, नातलग, लहान मुलांना आणल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. सप्तश्रृंग गडावरील महत्त्वाकांक्षी फनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प अजून सुरू झालेला नाही. कोणीतरी फनिक्युलर ट्रॉलीची चाचणी सुरू असताना, त्याचे छायाचित्रण करून ते फेसबुकवर टाकले. त्यातून ट्रॉली सुरू झाल्याची अफवा पसरल्याने, सप्तश्रृंग गडावर मुंबई, पुणे, अहमदाबाद,बडोदा व गुजरातचा इतर भाग, मध्य प्रदेश, बंगळुरू येथून भाविक दर्शनासाठी व प्रकल्प बघण्यासाठी येत आहेत.मी फेसबुकवर फनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्याचा व्हिडीओ बघितला. त्यामुळे मी माझे वृद्ध आई-वडील व संपूर्ण परिवाराला घेऊन मुंबईवरून गडावर देवीच्या दर्शनाला आलो, परंतु येथे आल्यावर ही माहिती खोटी असल्याचे कळले.- कैलास चोपडा, भाविक, मुंबई
सप्तश्रृंग गडावर ट्रॉली सुरू झाल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:40 AM