लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव मूळ : पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये सध्या दहा रुपयांचे नाणे बंद झाले आहे, ही अफवा पसरली आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मार्केटमध्ये व्यवहार करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी ही नाणी स्वीकारली जात नसल्याचे आढळून येत आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर चलन टंचाई निर्माण झाली होती. चलन टंचाईवर मात करण्यासाठी बँकांद्वारे पाच व दहा रुपयांची नाणी बाजारात आणली गेली. नोटाबंदीमुळे सहजासहजी चलन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांनी देखील ही नाणी बँकांकडून स्वीकारली. परंतु सध्या बाजारामध्ये दहा रुपयांची नाणी वापरून व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याचे ग्राहकांना काही व्यापारांकडून सांगण्यात येत आहे. भाजी मार्केटमध्ये याचे प्रमाण जास्त असून या सर्व प्रकारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. यासंबंधी बँकेत विचारणा केली असता, असे सांगितले की, दहा रुपयांचे नाणे बंद केल्याबाबत आरबीआयकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवाच असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा
By admin | Published: May 14, 2017 1:10 AM