लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महादेव मंदिरामध्ये नंदी पाणी पीत असल्याच्या अफवेमुळे शनिवारी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली. काही ठिकाणी तर लाबंच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ वाजता शिरसोली (ता. जळगाव) गावात ही अफवा पसरली आणि आजच्या व्हॉटस्ॲपच्या युगात ती खान्देशभर पसरली नसेल तर नवल.
सोशल मीडियामुळे मंदिरांमध्ये भाविकांची झुंबड उडाली. शिरसोली (ता. जळगाव) येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंचासह सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील एक महिला सकाळी ९ वाजता महादेव मंदिरात पूजेसाठी गेली होती. तिला नंदीने पाणी पिल्याचा भास झाला आणि तिने हा प्रकार इतर महिलांना सांगितला. त्यानंतर जळगावसह, धुळे व नंदुरबार जिल्हे तसेच पाळधी, चिनावल, कुऱ्हे पानाचे यासह लहान- मोठ्या गावांमध्ये अफवेचे लोण पसरले आणि मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगाच लागल्या. नंदीला पाणी पाजण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.
नंदुरबार येथे मध्य प्रदेश सीमेवरून ही अफवा सकाळी नंदुरबार शहरात धडकली. त्यानंतर सीमेनजकची गावे आणि नंदुरबार शहरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये गर्दी झाली होती.धुळे शहरात १०० फुटी रोडवरील नाटेश्वर महादेव मंदिर आणि पिंपळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातही अफवा पसरली होती. जाणकारांच्या मते दगडांच्या मूर्ती जीर्ण झाल्याने त्यावर पाणी टाकल्यानंतर ते शोषले जाते.
गणपती दूध (नाही) प्यायला त्या घटनेची आठवण ताजी२१ सप्टेंबर १९९५ हा दिवस असाच एका अफवेला जन्म देत उजाडला होता. तेव्हा आजसारखी व्हॉटस्ॲप,ट्विटर,फेसबुक यासारखी समाजमाध्यमे नव्हती. पण तरीही गल्लीपासून, दिल्लीपर्यंत गणपती दूध पिल्याची अफवा झपाट्याने पसरली होती. काही वेळातच देशभरात दुधाची टंचाई निर्माण झाली. परदेशांतही हे लोण पसरले होते. लोक दुधाचे भांडे घेऊन मंदिरासमोर रांगा लावत होते. जगभरातील वृत्तपत्रे आणि टीव्हीवर ही बातमी होती.
अशी पसरली अफवाn सकाळी ९ वा. : शिरसोली (ता. जळगाव) येथे एका महिलेस नंदी पाणी पित असल्याचा भास झाला. त्यानंतर मंदिरात गर्दीn सकाळी १० वा. : जळगावातील जिजाऊ नगर येथेही अफवा पसरली. n दुपारी १२.३० वा. : नंदी पाणी पितो, असे धुळे शहरात काही लोक सांगू लागले. नंतर मंदिरांमध्ये गर्दी झाली. n दुपारी २ वा. : नंदुरबार शहरात मध्य प्रदेशातून अफवा येऊन धडकली.n दुपारी ४ ते सायं ७ : खान्देशातील चिनावल, पाळधी, पाचोरा, गुढे, निपाणे येथेही मंदिरांमध्ये नंदीला पाणी पाजण्यासाठी गर्दी.
दैवी चमत्कार नाही, वैज्ञानिक कारण हा कुठलाही दैवी चमत्कार नाही. पाण्याचा पृष्ठीय ताण व गुरुत्वाकर्षणामुळे पाणी शोषले जाते. यातील कार्यकारण भाव हा वैज्ञानिक आहे. मात्र, ते पाणी मूर्तीच्या पोटात जात नाही. त्यामुळे नंदीची मूर्ती पाणी पिते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. यात काही लोकांचा स्वार्थ आहे. याला कुणीही बळी पडू नये. - अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती