लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियावरील कॉपी पेस्ट आणि अफवांमुळे रेल्वेचे अधिकारी भलतेच त्रस्त झाले आहेत. जुन्याच बातम्या आणि संदेश पुन्हा-पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, त्यांच्या चौकशीसाठी प्रवाशांचे अनेक फोन अधिकाऱ्यांना येत आहेत. त्यामुळे या समस्येला कशा प्रकारे उत्तर द्यावे, या चिंतेत अधिकारी त्रस्त आहेत.सोशल मीडियावरील संदेश वेगाने व्हायरल होतात. संदेशाची सत्यता न पडताळता तो संदेश फॉरवर्ड केला जातो. या व्हायरल मेसेजेसमध्ये ‘दिवा-सावंतवाडी रेल्वे अपघात’, ‘१५ मे पासून मुंबई-मडगाव तेजस वातानुकूलित एक्स्प्रेस धावणार’ या संदेशाचा समावेश आहे. त्याचा त्रास अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनाही होत आहे.प्रवाशांच्या मनात भीती पसरवण्याच्या उद्देशाने असे संदेश व्हायरल करण्यात येत असल्याचे, रत्नागिरी आरपीएफ इनचार्ज कुलदीप सिंग यांनी सांगितले. सिंग म्हणाले की, दिवा-सावंतवाडी अपघाताच्या बनावट मेसेजमुळे गेल्या दोन दिवसांपासून ४० ते ५० फोन आले आहेत. संबंधित फोन करणाऱ्यांचे नातेवाईक या गाडीने प्रवास करत होते. त्यांचा फोन न लागल्याने खरोखरच अपघात झाला आहे का? याची विचारणा ते करत होते. त्यामुळे अशा संदेश आणि छायाचित्रांमुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सिंग यांनी केले आहे.बहुचर्चित ‘मुंबई-मडगाव वातानुकूलित तेजस एक्स्प्रेस’ १५ मे रोजी सुरू होणार आहे, अशा संदेशामुळे प्रवासी संभ्रमावस्थेत असल्याचे आढळून आले. तेजस एक्स्प्रेस कधी सुरू होणार? याबाबतची माहिती प्रशासनाकडेही नाही. चुकीचे संदेश पसरवून प्रवाशांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांनी असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे सांगत, या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाला चौकशीचे आदेश दिल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.‘दिवा-सावंतवाडी अपघात’दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला नागोठाण्याजवळ अपघात झाला आहे. भिसेखिंडजवळ बोगद्यात काही डबे तर काही डबे बोगद्याबाहेर आहेत. दरम्यान, घटनास्थळी अद्याप कोणीही आलेले नसून, कुर्ला आणि कल्याणहून मेडिकल रिलिफ ट्रेन रवाना झाल्या आहेत.‘मुंबई -गोवा जलद प्रवास’१५ मे पासून मुंबई-मडगाव वातानुकूलित एक्स्प्रेस सुरू होत आहे. ताशी १६० किमी वेगाने ही पंचतारांकित ट्रेन धावणार असून, भाडे शुल्क ७० टक्क्यांनी कमी असणार आहे. मुंबईहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी ट्रेन मडगावला १८.३० वाजता पोहोचेल.
सोशल मीडियावरील अफवांचा रेल्वे प्रशासनाला त्रास
By admin | Published: May 10, 2017 2:41 AM