मुंबई : एसटीचा संप मोडीत काढण्यासाठी सरकार विविध स्तरांवरून प्रयत्न करीत आहे. कर्मचारी कामावर परतल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. वस्तुस्थिती वेगळी आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका शुक्रवारी पुन्हा एकदा संपकऱ्यांनी घेतली.एसटी कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर न परतल्यास सेवा समाप्तीची कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. सरकारने कितीही दबावतंत्राचा अवलंब केला तरी विलीनीकरणाची मागणी पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.संविधान दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी संविधान साक्षरता परिषद झाली. ॲड. गुणरत्न सदावर्ते अध्यक्षस्थानी होते, तर आंदोलक सविता पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
‘सदाभाऊंना मुक्त केले’- गेल्या काही दिवसांत एसटीच्या संपात दिसणारे सदाभाऊ खोत अचानक गायब झाले आहेत. ते आता सरकारचे गडी झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही आंदोलनातून मुक्त केले आहे, असा खोचक टोलाही ॲड. सदावर्ते यांनी लगावला.- संजय राऊत संसदीय सदस्य असूनही त्यांनी माझी लायकी काढली. यावरून त्यांचा जातीद्वेष दिसून येतो. यापुढे त्यांनी कायदेशीर टोले सहन करण्याची ताकद ठेवावी.- राऊतांमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोणत्याही विभागात, कधीही चर्चेसाठी बोलवावे. त्यांच्याशी समोरासमोर चर्चेची माझी तयारी आहे.- राऊत हे शरद पवारांचा आवाज आहेत. एकदा तरी एसटी कामगारांची विचारपूस करायला आले असते, तर त्यांना मानले असते, अशी टीका केली.