ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा पाकिस्तान करत असताना आता राजकीय पक्षांनीही पुरावे मागण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले असताना आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीदेखील राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवल्याचा आरोप भाजपावर केला आहे. सुरुवातील ट्विट करुन टीका करणा-या संजय निरुपम यांनी नंतर जाहीर पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत.
भारतीय सैनिकांच्या ताकदीचा गर्व आहे, पण भाजपा राजकीय फायदा घेत आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपाकडून पोस्टरबाजी सुरु आहे. सर्जिकल स्ट्राईकचा फक्त राजकारणासाठी वापर होत असून देशाचे जवान शहीद होत असताना भाजपा त्याचा राजकीय फायदा उचलत आहे असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
पाकिस्तानने भारताच्या कारवाईवर आक्षेप घेतला तरीही भारताने पुरावा का दिला नाही असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला. सर्जिकल स्ट्राईकबाबत '56 इंचाच्या छाती'कडून पुरावे सादर होत नाहीत, तोपर्यंत शंका राहणारच असंही संजय निरुपम बोलले आहेत.
प्रत्येक भारतीयाची सर्जिंकल स्ट्राईक व्हावी अशीच इच्छा आहे. पण भाजपाप्रमाणे राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकच्या अफवा पसरवण्यात येऊ नयेत असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं होतं. संजय निरुपम यांची ही बेताल बडबड असल्याची टीका भाजपाने केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीच सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं.
Every Indian wants #SurgicalStrikesAgainstPak but not a fake one to extract just political benefit by #BJP.Politics over national interest pic.twitter.com/4KN6iDqDo5— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 4, 2016