ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 7- पोलीस फौजदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची उस्मानाबाद येथील घटना संतापजनक आहे. आरोपी पोलीस खात्यातील असला तरी त्याला कसलीही सहानुभूती मिळणार नाही, याची दक्षता घेत शासनाने चांगला सरकारी वकील नियुक्त करून ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.
फौजदाराने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना माहिती झाल्यानंतर पवार यांनी रविवारी तातडीने उस्मानाबादला भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर प्रकरण गांभीर्याने हाताळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात अलीकडील काळात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या घटनेवेळीच याची नोंद घेतली होती. नव्या पिढीला अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही सर्वांनी तातडीने उस्मानाबादला येण्याचा निर्णय घेतला. अशी प्रकरणे समाज गांभीर्याने घेतो, हे सांगण्याचाच आमचा हेतू असल्याचे ते म्हणाले.
पीडित मुलीची कसल्याही प्रकारची ओळख बाहेर येता कामा नये. यासाठी जाणीवपूर्वक तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना भेटायचे टाळले. माध्यमांनीही याबाबत दक्ष राहायला हवे, असे ते म्हणाले. उस्मानाबादेतील सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक होते. तसा निर्णयही झाला, ही बाब चांगली आहे. सदर केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला तातडीने शिक्षा झाल्यास अशा प्रवृत्तींवर जरब बसेल. त्यामुळेच या खटल्यासाठी चांगला शासकीय वकील देऊन पीडितेचे जबाब न्यायालयासमोर ‘इनकॅमेरा’ नोंदवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. जयदेव गायकवाड, आ. राहुल मोटे आदींची उपस्थिती होती.