ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - आता ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) या योजनेखाली साधारणपणे एक तासाच्या विमानप्रवासाचा खर्च अडीच हजार रुपये असेल. देशातील ७0 शहरांतील आणि १२८ मार्गांवर विमानप्रवासासाठी ही सोय करण्यात आली आहे. ही विमानसेवा सुरु करण्यासाठी हालचालीदेखील सुरु झाल्या आहेत. या योजनेत कोल्हापूरचादेखील समावेश असून पुढील 10 दिवसांमध्ये मुंबई - कोल्हापूर ही विमानसेवा सुरु होईल अशी माहिती महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरात विमानससेवा सुरु करण्यासाठी एका विमान कंपनीचा सरकारकडे प्रस्ताव आल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव या सहा शहरांचा उडाण योजनेत समावेश असून या ठिकाणी अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये विमानाने प्रवास करता येणार आहे. याखेरीज पुणे ते नाशिक हा प्रवासही अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. देशातील ७0 शहरांतील आणि १२८ मार्गांवर विमानप्रवासासाठी ही सोय करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अजून पाच शहरांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शहारांचा समावेश आहे.
देशातील ७0 शहरांसाठीच्या विमानसेवेसाठी पाच विमान कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. इंडियन एअरलाइन्सशी संबंधित एअरलाइन अलाइड सर्विसेस, स्पाइसजेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा, टर्बो मेघा अशी कंपन्यांची नावे आहेत. स्पाइसजेट, एअर डेक्कन व एअरलाइन अलाइड सर्विसेस या कंपन्यांनी सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या सेवेसाठी सुरुवातीला १७/१८ आसनक्षमता असलेल्या विमानांचा वापर केला जाणार आहे. या कंपन्यांनी एका तासाच्या प्रवासासाठी अडीच हजार रुपयांहून अधिक रक्कम आकारू नये, असे बंधन घालण्यात आले आहे.
नागरी विमान वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, ७0 शहरांची सध्या उडानसाठी निवड करण्यात आली आहे. या ७0पैकी ३१ विमानतळांवर सध्या विमाने येत वा जात नाहीत, तर १२ विमानतळे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत.
उडाणमधील महत्वाचे नियम व अटी -
उडाण योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्यालाच या संधीचा फायदा मिळेल.