नाशिक : पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी दुपारी २च्या सुमारास भर वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्यावर बेवारस बॅग सापडली. त्यामुळे एकच धावपळ उडाली.या रस्त्यावरील वाहतूक तासभर अन्यत्र वळवून बॉम्बशोधक व नाशक पथकाने संशयित बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यात केवळ कपडे व मोबाइलचा चार्जर सापडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षक भिंतीजवळ बेवारस बॅग सापडल्याने नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला होता. एका व्यक्तीने सरकारवाडा पोलिसांना बेवारस बॅगची माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्यावसायिकांनी भीतीपोटी तातडीने दुकाने बंद केली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११पासून ही बॅग पडलेली होती. पंजाबमधील गुरुदासपूर येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता परिसर निर्मनुष्य केला होता. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली आहे. (प्रतिनिधी)साधुग्रामला सशस्त्र वेढा!पंजाबमधील गुरुदासपूरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण साधुग्रामला जवानांनी सशस्त्र वेढाच घातला आहे. आखाड्यांच्याही सुरक्षेत वाढ केली आहे. वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. साधुग्रामकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून सशस्त्र जवानांना तैनात केले आहेत.आॅगस्टमध्ये पर्वणी १९ आॅगस्टला आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. २९ आॅगस्टला पहिली पर्वणी आहे. त्यामुळे तपोवन व पंचवटीतील मंदिरांभोवतीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहरातील लॉज, धर्मशाळा, हॉटेलचीही तपासणी केली जात आहे.
बेवारस बॅगेमुळे नाशकात धावपळ
By admin | Published: July 28, 2015 2:31 AM