सहदेव खोत-- पुनवत --आत्मविश्वास असेल तर वयाची बंधने तोडून माणूस यशाचे शिखर गाठू शकतो, हे सिद्ध करून दाखविले आहे कणदूर (ता. शिराळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक गोरखनाथ केकरे यांनी. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत धावणे प्रकारात तीन कास्यपदके जिंकून त्यांनी दोन वर्षातील २५ पदकांचा टप्पाही पार केला. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी केलेली ही कामगिरी सर्वांना चकित करणारी ठरली आहे.गोरखनाथ केकरे कणदूरच्या दत्त विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक. सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे सक्रिय सदस्य. लेखक, वक्ते, कवी अशीही त्यांची सर्वत्र ओळख. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आणखी एका क्षेत्रात भरारी मारली आहे, ती म्हणजे क्रीडा क्षेत्रात. ज्येष्ठांच्या धावणे, चालणे, रिले या क्रीडा स्पर्धेत गेल्या दोन वर्षात केकरे यांनी राज्यपातळीपासून मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत एकूण २५ वर पदके जिंकून, वयाच्या साठीनंतर तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच इतर आवडीही ते मनापासून जपत हा छंद जोपासत आहेत.केकरे यांनी राज्यातील कोल्हापूर, अंबरनाथ, नाशिक, मुंबई, येथील स्पर्धांबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश या राज्यात राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत.नियमित व्यायाम, योग्य आहार, आत्मविश्वास व जिद्द या चतु:सूत्रीमुळेच केकरे यांनी आज वयाच्या ६७ व्या वर्षीही असे उज्ज्वल यश मिळविले आहे.केकरे यांनी गतवर्षी मलेशियात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५ कि.मी. चालणे प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे.
सदुसष्ट वर्षांच्या ‘तरुण’ धावपटूचा करिष्मा
By admin | Published: April 13, 2017 9:52 PM