बोरगाव मंजू : अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या एका ट्रकला आग लागून तो जळून खाक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शालीमार ढाब्याजवळ सोमवारी दुपारी घडली. यात ट्रकमधील साहित्य जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा सी.जी. ०४ - ६६७८ क्रमांकाचा ट्रक औषधे व सौंदर्य प्रसाधने आदी साहित्य घेऊन अकोल्याहून अमरावतीकडे जात होता. दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान दाळंबी-कोळंबी ते अंभोरादरम्यान कॅबिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ट्रकला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक कविता पेट्रोल पंपाजवळच्या शालीमार ढाब्याच्या प्रांगणात नेला. महामार्गावरून जात असलेले मूर्तिजापूरचे परीविक्षाधीन ठाणेदार आयपीएस अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे यांना ट्रकला आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तातडीने मूर्तिजापूर व अकोला येथील अग्निशमन दलांना पाचारण केले. दोन बंबांनी ट्रकची आग आटोक्यात आणली. तोपर्यंत ट्रकचा बराच भाग जळून खाक झाला होता. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देशमुख व हेकॉ अरुण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
धावत्या ट्रकला आग
By admin | Published: June 16, 2014 7:55 PM